पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना अस्वस्थ वाटत होते. खोकल्याचा त्रास सुरु होता. आज बारामतीमध्ये असतानाच त्यांना त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे रुग्णालयात विशेष वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले होते.
रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचे की घरी सोडायचे यावर निर्णय घेतला जाणार आहे. आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉल चे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांची तपासणी करू, त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ. असे त्यांनी म्हटले आहे.
रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त
शरद पवार रुग्णालयात दाखल होणार असल्याचे समजताच रुबी हॉल क्लिनिक परिसरात कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. पवारांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती डॉक्टरांच्या तपासणीनंतरच समोर येईल.